धक्कादायक! सांगलीत ९ जणांची सामूहिक आत्महत्येने खळबळ
![सांगलीत ९ जणांची सामूहिक आत्महत्या; 'असा' आहे हृदय पिळवटून टाकणारा घटनाक्रम](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/सांगलीत-९-जणांची-सामूहिक-आत्महत्या-असा-आहे-हृदय-पिळवटून-टाकणारा.jpg)
सांगली : ९ जणांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना मिरज तावुक्यातील म्हैसाळ येथे घडली आहे. सख्या भावांनी आपल्या आई, पत्नी व मुलांच्यासह एकाच वेळी विष पिऊन आपले जीवन संपवले आहे.काळीज सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. म्हैसाळ येथील सामूहिक आत्महत्येचा प्रकार हृदय पिळवटून टाकणारा होता. सकाळी नरवाड रोडवरील आंबिका चौक येथे राहणारे पशूवैद्यकीय डॉक्टर माणिक वनमोरे यांच्या घराचा दरवाजा उशिरापर्यंत उघडला नाही. त्यामुळे शेजारच्यांनी घराचा दरवाजा जाऊन ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर संशयातून शेजारच्यांनी घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. मात्र तेव्हा अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. सहा जणांचे मृतदेह निपचित वेगवेगळ्या ठिकाणी पडल्याचे दिसून आले. ही घटना वाऱ्यासारखी पसरताच आणखी एक हृदय हेलावणारी धक्कादायक घटना समोर आली. ती म्हणजे माणिक वनमोरे यांचे बंधू असणारे शिक्षक पोपट वनमोरे यांनी देखील आपल्या कुटुंबासमवेत राजधानी हॉटेल जवळ असणाऱ्या आपल्या घरात आत्महत्या केली.
माणिक वनमोरे हे पशुवैद्यकीय डॉक्टर असून ते म्हैसाळ गावासह आसपासच्या परिसरात ते परिचीत होते. तर पोपट वनमोरे हे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस होते. माणिक व मोरे यांना एक मुलगा आणि मुलगी पत्नी आणि आई असा परिवार होता. शिक्षक बंधू पोपट वनमोरे यांना देखील एक मुलगा आणि एक मुलगी आणि पत्नी असा परिवार होता. ही दोन्ही कुटुंबे गावातच पण विभक्त राहत होती. एक ते दीड किलोमीटर अंतरावर दोघा भावांची घरे होती. डॉक्टर आसणारे माणिक वनमोरे यांची दोन्ही मुले शिक्षण घेत होती. तर, पोपट वनमोरे यांची मुलगी अर्चना ही कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील बँक ऑफ इंडियाच्या बाचणी शाखेत ग्रंथपाल म्हणून नोकरीस होती. तर मुलगा शिक्षण घेत होता. सोमवारी पोपट वनमोरे यांनी अर्चना हिला घरी बोलवून घेतले होते. सायंकाळच्या सुमारास ती घरी पोहचली होती.रात्रीच्या सुमारास दोन्ही कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या केली. विशेष म्हणजे पोपट वनमोरे यांचा मुलगा शुभम वनमोरे हा काका माणिक पवार यांच्या घरात किचन रूममध्ये मृत अवस्थेत आढळून आला.
या घटनेनंतर म्हैसाळ गावात मयत वनमोरे कुटुंबीयांच्या घरासमोर नातेवाईक आणि नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह अख्खे पोलीसदल घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य पाहून गावात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.