माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मतदानाची संधी मिळण्याची शक्यता खूपच धूसर; कारण…
![अनिल देशमुख यांना मतदानाची संधी मिळण्याची शक्यता खूपच धूसर; कारण...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/अनिल-देशमुख-यांना-मतदानाची-संधी-मिळण्याची-शक्यता-खूपच-धूसर-कारण.jpg)
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाची संधी मिळण्याची शक्यता खूपच धूसर आहे. कारण कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवरच सुनावणी होऊन मतदानाच्या परवानगीबाबत अद्याप कोणताही सकारात्मक आदेश आलेला नाही. उच्च न्यायालयात प्रत्येक न्यायालयाला सुनावणीचे विषय मुख्य न्यायमूर्तींकडून नेमून दिलेले असतात. त्यानुसार हा विषय न्यायमूर्ती प्रकाश नाईक किंवा न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्याकडे सुनावणीसाठी जाऊ शकतो. मात्र, देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांनीही वैयक्तिक कारणांमुळे पूर्वी नकार दिला होता.
या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्या वकिलांना याचिकेवर सुनावणी होण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींकडे जाऊन विशेष एकल न्यायाधीश पीठ नेमण्याची विनंती करावी लागेल. असे विशेष पीठ नेमले जाण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते. शिवाय नवाब मलिक यांच्या बाबतीतच अद्याप कोणताही सकारात्मक आदेश आलेला नसल्याने आणि विधानभवनात मतदान होण्यासाठी सायंकाळी ४ पर्यंतच वेळ असल्याने विशेष पीठ नेमण्याची विनंती मुख्य न्यायमूर्तींना करण्याच्या हालचाली करण्यास देशमुख यांचे वकील फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे. परिणामी देशमुख यांना मतदानाचा दिलासा मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर झाली आहे.
- मलिकांबाबत कोर्टाने काय सांगितलं?
मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्याकडून तातडीचा दिलासा देण्यात आलेला नाही. मात्र याचिकेत दुरुस्ती करून योग्य त्या कोर्टात जाण्याची मुभा दिली गेली आहे. तातडीच्या याचिका दुरुस्तीनंतर दुपारी १.३० वाजता अन्य कोर्टात मलिक यांची याचिका सुनावणीला जाण्याची शक्यता आहे.