लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून; संशयित फरार
![Murder of a woman living in a live-in relationship; The suspect absconded](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/The-suspect-absconded.jpg)
सोलापूर : महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या एका इसमाने आपल्याच सहकारी महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आलीय. ही घटना बार्शी शहरातील पंकजनगरमध्ये घडली. मृत महिला आणि आरोपी हे दोघेही पश्चिम बंगाल येथील रहिवाशी आहेत. मृत महिला ही देहविक्रय व्यवसायात असल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात बागबुल उर्फ शाकीर हुसेन शेख (रा. कलबंगा ता.नाक्षीपारा जि.नाडीया,राज्य पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक सारीका गटकुळ यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेतील मृत मुस्लिमा लुथफार सरदार (वय ३५) हिला शनिवारी रात्री अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्या शवविच्छेदन अहवालात अंगावर जखमा व गळफासाच्या खुणा आढळून आल्या. मृत्यूचे कारण गळा आवळल्यामुळे असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार बार्शी पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिच्यासमवेत गेली ३ वर्षे राहणारा बागबुल हा शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास तिच्या घरी आला होता. त्याच्या येण्यावरुन दोघांत वाद झाला. त्यानंतर शनिवारी तो तिला कामास जावू नको असे म्हणत होता. त्यावरुनही त्यांचे भांडण झाले.
शेवटी दुपारी ४ वाजता बागबुलने तिची मुले महाबूर (वय ११) व असिफ (वय १०) यांना खेळण्यासाठी घरा बाहेर पाठविले. थोड्या वेळाने मुले परतली असता, त्यांना आपली आई मुस्लिमा ही किचनमध्ये गळ्याभोवी ओढणी गुंडाळलेल्या अवस्थेत निपचित पडलेली आढळून आली.त्यांनी घरमालक बापू मिरगणे यांना बोलावून तिला दवाखान्यात नेले. तिथे ती मयत झाली असल्याचे सांगण्यात आले.
बागबुल हा दोघांचेही मोबाईल बंद करुन फरार झाला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार करीत आहेत.