‘आघाडी धर्माचा विसर’, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंचा सरकारला घरचा अहेर
!['Aghadi Dharmacha Visar', Shiv Sena MP Shrikant Shinde's attack on the government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Aghadi-Dharmacha-Visar-Shiv-Sena-MP-Shrikant-Shindes-attack-on-the-government.jpg)
मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये त्रिसूत्री कार्यक्रम पाळला जात नाही,’ असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी करून सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘निधीवाटपाबाबत ठरलेले सूत्र वापरले जात नाही. मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे,’ असे शिंदे यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या बातम्या येत असताना आता शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे त्याला एकप्रकारे दुजोरा मिळाला आहे.
महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नाही, असा आरोप भाजपकडून दीर्घकाळापासून होत आहे. मात्र त्यांच्या या आरोपात तथ्य नसल्याचा दावा आघाडीतील नेत्यांकडून केला जात होता. मात्र आता शिवसेनेच्याच खासदाराने आघाडीत आलबेल नसल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. ‘महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा काही नियम, त्रिसूत्री मांडली गेली होती. मंत्रीपदाचे समसमान वाटप केले गेले होते. त्याचबरोबर निधीचे समसमान वाटप करण्याचेही ठरले होते. निधीबाबत ६०-२०-२० असे सूत्र ठरले होता. एखाद्या पक्षाचे पालकमंत्री असतील तिथे दुसऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना कमीत कमी २० टक्के निधी मिळायला हवा. सातारा जिल्ह्यात असे झाल्याचे आढळत नाही. शिवसंपर्क अभियानांतर्गत सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. अन्य घटक पक्षांनी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. या गोष्टी आम्ही पक्षप्रमुखांपर्यंत नेणार आहोत,’ असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
‘राष्ट्रवादीची दडपशाही’
दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी यापूर्वीही अशी भूमिका मांडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डावलत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचा आमदार निवडून येऊ शकतो तिथे राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि काँग्रेसला चिरडून टाकले जात आहे. यामुळेच शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे, असे दरेकर म्हणाले.