राज्यात ५० टक्के लसीकरण केंद्रे बंद; प्रतिसाद मिळत नसल्याने निर्णय
![50% immunization centers closed in the state; Decision not received response](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/50-immunization-centers-closed-in-the-state-Decision-not-received-response.jpg)
मुंबई | राज्यात लसीकरणाला मिळत असलेला प्रतिसाद सातत्याने कमी होत असल्याने सुरू केलेल्या एकूण लसीकरण केंद्रांपैकी ५० टक्के केंद्रे बंद करण्यात आली आहेत. करोनाव्यतिरिक्त आजारांच्या वैद्यकीय सेवांसाठी या केंद्रांचा वापर पूर्वीप्रमाणे सुरू झाला आहे. करोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असताना राज्यात जवळपास १२ हजार लसीकरण केंद्रांची उपलब्धता होती, ती आता सहा हजारांपर्यंत आली आहे. त्यात शहरी व ग्रामीण भागांतील लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. राज्यात पावणेदोन कोटी लाभार्थ्यांचे लसीकरण अद्याप शिल्लक आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी बजावणारा महाराष्ट्र लसीकरणामध्ये पिछाडीवर गेला आहे.
ज्या केंद्रावर लाभार्थी येत नाही, त्या केंद्रामध्ये ही सेवा व मनुष्यबळाची उपलब्धता किती कालावधीपर्यंत ठेवायची हा प्रश्न स्थानिक पातळीवरील आरोग्यकेंद्रामधून सातत्याने उपस्थित करण्यात येत होता. लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी घरघर दस्तक नावाची मोहिमही राबवण्यात आली. त्यासाठी राज्यात आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांना जबाबदारी देण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेसाठी ज्यांनी लसीकरण केले नाही, त्या व्यक्तींच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. या व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांना लसीकरणाचे महत्त्व सांगणे, लसीकरण करून घेण्यासाठी आग्रहही करण्यात आला. मात्र तरीही प्रतिसाद न मिळाल्याने आरोग्य कर्मचारी मेटाकुटीला आले. प्रतिसाद मिळत नसल्याने ही मोहिमही तीन महिन्यांनी बंद करण्यात आली. ‘शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. मात्र संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम उपाय आहे’, असे राज्याच्या लसीकरण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.
मात्रांच्या अपव्ययात थोडी वाढ
लस देताना कुपी उघडल्यानंतर किमान दहा जणांना ती द्यावी लागते. अन्यथा मात्रा वाया जाण्याची शक्यता असते. काही केंद्रांवर एकावेळी इतके लाभार्थी येत नाहीत. त्यामुळे पूर्वीपेक्षा मात्रा वाया जाण्याचे प्रमाण थोडे वाढले आहे. राज्यात सध्या एक कोटी तीस लाख मात्रांची उपलब्धता आहे. हा साठा पुरेसा असून या मात्रा मुदतबाह्य होण्याचा कालावधी हा ऑगस्ट, सप्टेंबर आहे. त्यापूर्वी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे आहे.
खासगी केंद्रांनीही पाठ फिरवली
लसीकरण सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयांच्या दीड हजार केंद्रांमधून लसीकरणाची उपलब्धता होती. सध्या २९० केंद्रामध्ये लसीकरण सुरू आहे. सशुल्क मात्रा या सार्वजनिक केंद्रामधून विनाशुल्क देण्याची सुरुवात झाल्यानंतर जागा, मनुष्यबळ यांच्या उपलब्धतेसह लस देण्याचा खर्च रुग्णालयांना परवडत नसल्याचे कारण देत खासगी केंद्रांनीही याकडे पाठ फिरवली. ‘मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अभ्यासामध्ये लसीकरणामुळेच अनेक रुग्णांचे प्राण वाचल्याचे सिद्ध झाले आहे’, असे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. एम. एम. नायर यांनी सांगितले.
असे आहे चित्र
कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा न घेतलेल्यांची संख्या १,४१,८८,६०५
कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा राहिलेल्या लाभार्थ्यांची संख्या ३२,६७,४६१ .
१८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीतकमी एक मात्रा दिलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण – ९२.२७ टक्के
१८-४४ या वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीतकमी एक मात्रा दिलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण – ८७.३४ टक्के
४५ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीतकमी एक मात्रा दिलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण – ९०.३५ टक्के
१५-१८ या वयोगटातील एक मात्रा दिलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण- ६४.६० टक्के
१२-१४ वयोगटातील एक मात्रा दिलेल्यांचे प्रमाण – ५६.५० टक्के