संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवा, छत्रपतींना मान खाली घालायला लावू नका : पंकजा मुंडे
![Send Sambhaji Raje to Rajya Sabha, don't force Chhatrapati to bow down: Pankaja Munde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/संभाजीराजेंना-राज्यसभेवर-पाठवा-छत्रपतींना-मान-खाली-घालायला-लावू-नका.jpg)
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरला आहे. सेनेची मुलुखमैदानी तोफ संजय राऊत आणि कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीराजेंसाठी महाविकास आघाडीला आवाहन केलं आहे. संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवा, छत्रपतींना मान खाली घालायला लावू नका, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मराठा संघटनांचा त्यांना असलेला पाठिंबा, विदर्भ आणि मराठवाडा या भागात त्यांची तयार झालेली जनप्रतिमा आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आलेल्या राजकीय महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही घोषणा म्हणजे शिवसेना आणि भाजपची कोंडीच मानली जात होती. यामुळे दोन्ही पैकी एक पक्ष अथवा महाविकास आघाडी आपल्याला मदत करेल असा विश्वास त्यांना वाटत होता. मराठा व्होट बँकेच्या जोरावर महाविकास आघाडी अथवा शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळेल, भाजप त्याला विरोध न करता पाठिंबा देईल हा त्यांचा विश्वास आठ दिवसातच मावळला. राज्यसभेची लढाई लढण्याआधीच त्यांना माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीला आवाहन केलं आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
उदयनराजे भोसले यांच्या बाबतीमध्ये जी भूमिका आघाडी सरकारने घेतली होती, त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. आम्ही एका छत्रपतींना राज्यसभेवर पाठवलं, तुम्ही दुसऱ्या छत्रपतींना राज्यसभेवर पाठवा. ते छत्रपती आहेत. छत्रपतींना मान खाली घालायला लावू नका, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
लढण्याआधीच छत्रपतींची माघार?
राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार म्हणून घोषणा करत भाजप आणि शिवसेनेची कोंडी करणाऱ्या संभाजीराजेंची याच पक्षांनी कोंडी केल्यानेच लढण्यापूर्वीच माघार घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आमदारांकडून न मिळालेला प्रतिसाद, शिवसेनेची अट आणि एकदा तोंड भाजलेल्या भाजपकडून झालेले दुर्लक्ष यामुळे राज्यसभेचा किल्ल्ला सर करण्याची शक्यता मावळल्यानेच मैदानातून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा करावी लागणार आहे. तसे करताना हा निर्णय सन्मानजनक वाटावा, यासाठी ‘आता राज्यसभा नव्हे, राज्यच घेणार आणि त्यासाठी स्वराज्य संघटना बळकट करणार’ अशी घोषणा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपसाठी हा इशारा मानण्यात येतोय.