हिंंगोलीत सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याचा शेतात संशयास्पद मृत्यू, घटनेनं भीतीचे वातावरण
![हिंंगोलीत सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याचा शेतात संशयास्पद मृत्यू, घटनेनं भीतीचे वातावरण](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/हिंंगोलीत-सलग-दुसऱ्या-दिवशी-शेतकऱ्याचा-शेतात-संशयास्पद-मृत्यू-घटनेनं-भीतीचे.jpg)
हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील नहाद शिवारात एका शेतात ५२ वर्षीय शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी २३ रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आला आहे. बालाजी तुकाराम तांभारे (५२) रा. नहाद असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. हट्टा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील नहाद शिवारात बालाजी तुकाराम तांभारे यांचे शेत आहे. या शेतातच आखाडा असून तांभारे हे रविवारी २२ रोजी सायंकाळी शेतातील आखाड्यावर आले होते. त्यानंतर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह बाजेवर आढळून आहे. त्यांच्या पुतण्याने मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर हट्टा पोलिसांनाही माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच वसमतचे पोलिस उपाधिक्षक किशोर कांबळे, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक सतीष तावडे, जमादार भुजंग कोकरे, सियामोद्दीन खतीब,सुर्यकांत भारशंकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असून मृतदेहाच्या अंगावर कुठेही जखमा आढळून आल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, उत्तरीय तपासणीनंतरच मयताचा खून झाला का? हे स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत हट्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.