महापौर पदी योग्य व्यक्तीला संधी दिली जाईल; मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
पिंपरी – महापौर पदावर शत्रुघ्न काटे यांना संधी देण्याच्या मागणीसाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रविवारी (दि. 29) मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. त्यावर आपल्या पक्षामध्ये दबाव तंत्राचा वापर चालत नाही. त्यामुळे निश्चिंत रहा, योग्य वेळी योग्य व्यक्तीला संधी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती भाजपमधील अंतर्गत सुत्राने दिली.
महापालिकेतील महापौर पदासाठी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक शत्रुघ्न काटे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना संधी देण्याच्या मागणीसाठी जगताप गटातील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. दुपारी दोन वाजता त्यांना वेळ देण्यात आली होती. मात्र, साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत या विषयावर पंधरा ते वीस मिनिटे चर्चा केली. काटे यांना संधी देण्यात यावी, अशी शिष्टमंडळाची मागणी होती.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणताही निर्णय दिला नाही. कोणी कितीही पक्षावर दबाव आणला. तरी, आपल्या पक्षात दबाव तंत्राचा वापर चालत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य व्यक्तीला संधी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. एवढे ऐकून नगरसेवकांचे शिष्टमंडळ शहराकडे रवाना झाले.