उल्हासनगरच्या मोबाईल चोराचे महागडे शौक, २२ ब्रँडेड टीशर्ट आणि पँट्सची चोरी
![उल्हासनगरच्या मोबाईल चोराचे महागडे शौक, २२ ब्रँडेड टीशर्ट आणि पँट्सची चोरी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/उल्हासनगरच्या-मोबाईल-चोराचे-महागडे-शौक-२२-ब्रँडेड-टीशर्ट-आणि-पँट्सची.jpg)
उल्हासनगर: उल्हासनगरात मोबाईल शॉप फोडून १८ लाखांचे अॅप्पल कंपनीचे फोन चोरणाऱ्या चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याच चोरट्याने मोबाईल शॉप फोडण्याच्या काही दिवसाआधी एक कपड्याचं दुकान फोडून तिथून ब्रँडेड कपडे आणि शूज चोरल्याची माहिती आता समोर आलीये. याप्रकरणी त्याच्यावर चोरीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
उल्हासनगरच्या साउंड ऑफ म्युझिक दुकानात रविवारी ८ मे रोजी पहाटे एक चोरटा छत फोडून आत घुसला होता. त्याने दुकानातले १८ लाख ७२ हजार रुपयांचे अॅप्पल कंपनीचे फोन चोरून नेले होते. याप्रकरणात पोलिसांनी चोरटा महमद फिरोज नईम अहमद याला काही तासातच बेड्या ठोकत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला होता. यानंतर त्याच्या चौकशीदरम्यान त्याने मोबाईल दुकानात चोरी करायच्या काही दिवस आधी एका कपड्याच्या दुकानात चोरी करून कपडे चोरल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील स्टेशन रोडवर असलेल्या ‘अक्की’ नावाच्या दुकानात या चोरट्याने मोठा हात मारल्याचं समोर आलं.
या दुकानातून त्याने २२ ब्रँडेड टीशर्ट्स, ४ पॅन्ट, ३ हाफ पॅन्ट आणि ब्रँडेड शूज असा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात आयपीसी ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे चोरीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हा चोरटा मध्यवर्ती पोलिसांच्याच ताब्यात असून मोबाईल चोरी प्रकरणातले पोलीस कोठडी संपल्यावर त्याची कपडे चोरीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी घेतली जाईल, अशी माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.