कोल्हापुरातील गावाचा विधवांबाबत क्रांतिकारी निर्णय, हेरवाडमध्ये विधवा प्रथा बंद
![कोल्हापुरातील गावाचा विधवांबाबत क्रांतिकारी निर्णय, हेरवाडमध्ये विधवा प्रथा बंद](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/कोल्हापुरातील-गावाचा-विधवांबाबत-क्रांतिकारी-निर्णय-हेरवाडमध्ये-विधवा-प्रथा-बंद.jpg)
कोल्हापूर |
महाराष्ट्राची (Maharashtra) संपूर्ण देशभरात पुरोगामी राज्य अशी ओळख आहे. महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवणारे विचार दिले आहेत. रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार अशा अनेक गोष्टींची सुरुवात आपल्या राज्यात झाली आणि त्या योजना देशानं स्वीकारल्या. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हेरवाड (Herwad) गावानं महाराष्ट्रासह देशाला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे. हेरवाड ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करण्यात येत आहे. आगामी काळात हेरवाडचा आदर्श महाराष्ट्रभर घेतला जाऊ शकतो.
- विधवा प्रथा रद्द करण्यामागची भूमिका
आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी अंत्यविधीवेळी पत्नी च्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे हातातील बांगडया फोडल्या जातात. पायातील जोड़वी काढणे तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, ही परिस्थिती आहे. कायदयाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच कायदयाचा भंग होत आहे.
तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, या करीता विधवा प्रथा बंद करणेत येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करणेत यावी. त्यास ही सभा मंजूरी देत आहे, असा ठराव मंजूर करण्यात आला. हेरवाड ग्रामपंचयातीचे संरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुक्ताबाई संजय पुजारी यांनी ठराव मांडला. तर, सुजाता केशव गुरव, यांनी अनुमोदन दिलं आहे.
हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं स्वागत
हेरवाड ग्रामपंचायतीनं घेतलेल्या निर्णयाचं सोशल मीडियावरुन स्वागत करण्यात आलं आहे. हेरवाड ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन देखील केलं जात आहे.
कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांनी देखील यासंदर्भात अनेकदा भूमिका मांडलेली आहे. अनेक संघटना ही भूमिका घेऊन काम करत होत्या. हेरवाड ग्रामपंचायतीनं या संकल्पेना प्रत्यक्षात उतरवलं आहे.