राज ठाकरे यांची नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताकीद; म्हणाले, ‘माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत…’
![Raj Thackeray's warning to leaders and office bearers; Said, 'About my Ayodhya tour ...'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Raj-Thackerays-warning-to-leaders-and-office-bearers-Said-About-my-Ayodhya-tour-....jpg)
मुंबई| भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर आता त्यावर चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांना त्यांचा अयोध्या दौरा यशस्वी करायचा असून प्रवक्ते वगळता इतर कोणीही आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलू नये अशी स्पष्ट ताकीद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही सूचना सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. ते म्हणतात, ‘माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत. ते याबाबत बोलतील. इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये. तसेच इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे.’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या ५ जून रोजी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जात आहेत. आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत ठाकरे यांनी पुण्यात १७ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांनी अलिकडे उत्तर प्रदेशातील विकासाबाबत भाष्य केले आहे. तसेच आपल्या अयोध्या दौऱ्यात ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. अयोध्या दौऱ्याबाबत मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया अडचणीच्या ठरू नयेत याची काळजी राज ठाकरे घेत असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच त्यांनी आज आपले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात सूचना केली आहे.