मेट्रोसाठी 24 वृक्ष तातडीने काढणार
- आयुक्तांची मान्यता : तीन स्थानकांची कामे मार्गी लागणार
पुणे– महामेट्रो तसेच इतर शासकीय प्रकल्पांच्या कामात अडथळा ठरणारे वृक्ष काढण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी मान्यता दिली. वृक्ष प्राधिकरण समिती बैठकीत हे प्रस्ताव असून त्याला मान्यता न मिळाल्याने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तातडीची बाब म्हणून काही ठिकणच्या वृक्षतोडीस आपल्या अधिकारात परवानगी दिल्याचे राव यांनी सांगितले आहे.
वृक्षतोडीसाठी आयुक्तांनी परवानगी दिल्याने आता वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील तीन स्थानकांची कामे मार्गी लागणार आहेत. मेट्रो मार्गासह, कृषी महाविद्यालय आवारातील मेट्रो डेपोच्या कामासाठी काही ठिकाणची झाडे तातडीने काढावी लागणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव महामेट्रोने महापालिका वृक्षप्राधिकरण समितीसमोर ठेवला आहे. मात्र, समितीने हा प्रस्ताव अर्धवट असून मेट्रोकडून चुकीच्या पद्धतीने वृक्षतोड केली जात असल्याचे सांगत मेट्रोने अर्धवट प्रस्ताव न ठेवला परिपूर्ण प्रस्ताव ठेवावा, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार, मेट्रोने त्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यात तातडीची बाब म्हणून वनाज, आयडियल कॉलनी तसेच आनंदनगर येथील स्थानकांच्या कामात सुमारे 24 वृक्ष अडथळे ठरत आहेत. त्यातच हे वृक्ष काढण्यासाठी परवानगी नसल्याने या स्थानकांचे काम महामेट्रोला शक्य नाही. त्यामुळे किमान या झाडांसाठी तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत आयुक्त राव यांनी 24 वृक्षांची तोडणी करण्यास तातडीने मान्यता दिली.
मेट्रो करणार झाडांचे पुनर्वसन
आयुक्तांनी वृक्षतोडीस परवानगी दिली असली, तरी कोणतेही झाड मुळापासून तोडणार नसल्याचे महामेट्रोने यापूर्वीच म्हटले आहे. जी झाडे काढणे आवश्यक आहे ती कितीही मोठी असली, तरी त्याचे पुनर्रोपण करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या परवानगी मिळालेल्या झाडांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. त्यातील कमी कमी झाडे कशी काढता येतील, याचा प्रयत्न केले जाणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.