राज ठाकरेंच्या दोन मोठ्या घोषणा आणि राऊतांनी घातला वर्मी घाव; म्हणाले…
![Raj Thackeray's two big announcements and Raut's vermi wound; Said ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/राज-ठाकरेंच्या-दोन-मोठ्या-घोषणा-आणि-राऊतांनी-घातला-वर्मी-घाव.jpg)
मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे औरंगाबादमध्ये ज्या ठिकाणी सभा घेत तिथेच राज ठाकरेही आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील, अशी चर्चा आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज (Sanjay Raut On Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘कोणाला बाळासाहेबांची कॉपी करायची असेल तर तुम्ही काय करणार?’ असा टोला संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘राज यांच्या या दौऱ्यामुळे ना सरकारला आव्हान आहे ना शिवसेनेसमोर कोणतं आव्हान आहे. मराठवाड्याची आणि खासकरून संभाजीनगरची जनता कायमच शिवसेनेला शिवसेनेला समर्थन देत आली आहे. या देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणाला कुठे सभा घ्यायची असेल तर घेऊ द्यात आणि कोणीतरी इतर कोणत्या पक्षाच्या स्पॉन्सरशिपवर राजकारण करत असेल तर त्यांनी ते करू द्या. शिवसेना स्वत:च्या जीवावर महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण करत आहे आणि यापुढेही करत राहीन,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अयोध्या दौऱ्यावरूनही सोडलं टीकास्त्र
राज ठाकरे यांनी आपण ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘कोणी खुल्या मनाने अयोध्येला जात असेल तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मात्र कोणी जर राजकारणासाठी तिथे जात असेल तर रामलल्ला त्यांना आशीर्वाद देत नाही. शिवसेना आणि अयोध्येचं नातं राजकीय नाही तर भावनिक आहे,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या आगामी दोन दौऱ्यांवर संजय राऊत यांनी निशाणा साधल्यानंतर आता मनसेकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.