अवैधरीत्या मुरूम उत्खनन प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाची खालुम्ब्रे येथे कारवाई
पिंपरी l प्रतिनिधी
अवैधरीत्या जमिनीवर उत्खनन करून मुरूम चोरी केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने तिघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 13) मध्यरात्री सव्वादोन वाजता खालुम्ब्रे येथे करण्यात आली.
जेसीबी व हायवा मालक स्वप्नील संजय शिवेकर (वय 28, रा. इंदोरी), अभिजित आनंदराव शिंदे (वय26, रा. महाळुंगे, ता. खेड), राजेंद्र ईश्वरचंद्र प्रसाद (वय 28, रा. महाळुंगे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक दीपक शिरसाट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विनापरवाना स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने जमिनीवर उत्खनन करून विक्रीसाठी मुरुम चोरी केली. आरोपी स्वप्नील शिवेकर याने वाहनांची कागदपत्रे सोबत बाळगली नाहीत. अन्य दोघांनी वाहन चालवण्याचा परवाना सोबत बाळगला नाही. याबाबत कारवाई करण्यात आली आहे. तिघांच्या ताब्यातून पोलिसांनी 30 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.