सुप्रिया सुळे यांनी पवारांना दिलं सडेतोड प्रत्युत्तर
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या पाडवा मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद फोफावल्याचा पुनरुच्चार राज यांनी केला. आज खुद्द पवारांनी कोल्हापूरमध्ये राज यांना खास स्टाईलमध्ये उत्तर दिलं. पवारांवरील टीकेला त्यांची लेक खासदार सुप्रिया सुळे यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. एका ईडीच्या नोटीसीने राज ठाकरेंमध्ये एवढा बदल झाला, मला त्यांचं आश्चर्य वाटतं, अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळे केली.
हिंदुत्वाची शाल पांघरल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच गुडी पाडवा मेळाव्यात मनसैनिकांना संबोधित केलं. अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पिक्चर दाखवला. उद्धव ठाकरेंवर प्रहार करताना त्यांनी शरद पवार यांनाही सोडलं नाही. पवारांचं राजकारण जातीयवादी असल्याचा पुनरुच्चार करत सेनेला पवारांबरोबर जाण्यासाठी लोकांनी मतदान केलं नव्हतं, असंही राज म्हणाले. एकंदर राज ठाकरेंच्या कालच्या भाषणात उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रमुख टार्गेटवर होते
आज कोल्हापुरात बोलताना शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर दिलं. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज ठाकरेंना निशाण्यावर घेतलं. “शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाईन होत नाही, हे महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे पवारसाहेबांचं नाव घेऊन त्यांच्या पक्षाला त्याचा फायदा होणार असेल तर मला त्याचा आनंद आहे.”
“आम्हाला ईडीच्या कितीही नोटीसा येऊ द्यात. आम्ही घाबरणार नाही. आमची भूमिका आम्ही बदलणार नाही. राज ठाकरेंना ईडीची एक नोटीस आली काय, त्यांच्या भूमिकेत एवढा बदल झाला, मला खूपच आश्चर्य वाटतं”, अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.
“लाव रे तो व्हिडीओ म्हणून मोदी-शहांच्या विकासाचा बुरखा फाडणारे राज ठाकरे आणि आता मशीदीवरचे भोंगे उतरवा म्हणणारे राज ठाकरे यांचा प्रवास कुठल्या दिशेला होतोय, हे सांगण्याची काही आवश्यकता वाटत नाही”, असंही जाताजाता सुप्रिया सुळे म्हणाल्या.