भायखळा कारागृहातील 81 महिला कैद्यांना विषबाधा
मुंबई – मुंबईतील भायखळा कारागृहात असलेल्या 81 महिला कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सर्व महिला कैद्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळी नाश्त्यानंतर काही महिला कैद्यांनी पोटदुखी, उलट्या होण्याच्या तक्रारी कारागृह प्रशासनाकडे केल्या. हळूहळू अनेक कैद्यांच्या तक्रारी येउ लागल्यानंतर कारागृह प्रशासनाने तात्काळ या कैद्यांना रुग्णालयात दाखल केले.
आतापर्यंत 81 कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कैद्यांना सकाळच्या नाश्त्यातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. याबाबत कारागृह प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. पण अद्याप याप्रकरणी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शिया बोरा हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून विषबाधा झालेल्यांमध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश आहे.
हॉस्पिटलचे डीन मुकुंद तायडे यांनी सांगितले की, दुपारीपर्यंत 81 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व कैद्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीच्या त्रास हो आहे. यातील कोणाचीही प्रकृती गंभीर नसून ते सर्वजण उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. पुढील 48 तास त्यांना निरक्षणात ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असक डॉ. तायडे यांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार एका महिला कैद्याला कॉलरा झाला होता. त्यावेळी सर्व कैद्यांना प्रतिबंधात्मक गोळ्या देण्यात आल्या होत्या. या देण्यात आलेल्या गोळ्या आणि दूषित अन्न या दोन्ही गोष्टींमुळे आजची घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.