त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत; पवारांवर टीका करणाऱ्या खोत यांना राष्ट्रवादीचं कडक उत्तर
![त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत; पवारांवर टीका करणाऱ्या खोत यांना राष्ट्रवादीचं कडक उत्तर](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/त्यांच्या-दुखात-आम्ही-सहभागी-आहोत-पवारांवर-टीका-करणाऱ्या-खोत-यांना.jpg)
मुंबई: रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सत्ता गेल्यापासून उपाशी असलेल्या सदाभाऊ खोत यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्यानं ते बरळू लागले आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे.
‘सदाभाऊ खोत यांचं नामकरण ‘उपाशी खोत’ असं करण्याची गरज आहे. भाजपच्या वळचणीला जाऊन मंत्रिपद भोगलेले सदाभाऊ खोत यांना सत्ता गेल्यामुळं काहीच सुचेनासं झालं आहे. आदरणीय शरद पवार साहेब महाविकास आघाडीचे प्रणेते ठरल्यानंच सदाभाऊ खोत पवार साहेबांवर बरळू लागले आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मात्र, पवारसाहेबांवर बोलण्याइतपत त्यांची लायकी नाही हे त्यांनी आधी लक्षात ठेवावं,’ असा बोचरा टोला क्रास्टो यांनी हाणला आहे.
राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी देखील खोतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सदाभाऊंंनी शरद पवारांवर केलेली टीका हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. ही थुंकी स्वत:च्याच तोंडावर उडते हे सदाभाऊंना कळायला हवं. पुढील आमदारकी टिकवण्यासाठीच त्यांची ही धडपड सुरू आहे. सदाभाऊ हे स्वत: बोलत नाहीत. त्यांचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोपही मिटकरी यांनी केला आहे.
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
‘शरद पवारांनी या राज्यात काड्या करण्यापलीकडं काहीही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि पुन्हा दुसऱ्या घरात आग लावण्यासाठी निघून जायचं. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:चं पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं. या सगळ्यामध्ये हे राज्य होरपळून निघालं आहे, हे आता थांबलं पाहिजे,’ असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.