आता अमेरिकाही थेट तालिबानशी चर्चेस तयार
वॉशिंग्टन – अमेरिकेने आपल्या तालिबान विषयीच्या धोरणात आता बदल करून त्यांनी तालिबानी नेत्यांशी थेट चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. गेली 17 वर्ष तालिबान आणि अफगाण सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यावर कायमचा तोडगा निघावा यासाठी तालिबानी नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे.
या आधी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने तालिबानशी थेट चर्चा करण्यास नकार दिला होता. अफगाणिस्तान सरकारच्या सहभागाशिवाय आम्ही थेट तालिबानी नेत्यांशी बोलणार नाही असे अमेरिकेचे म्हणणे होते. खुद्द तालिबानी नेत्यांनीही अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करण्याची आमची इच्छा नाही असे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. एकवेळ आम्ही अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास तयार आहोत असेही त्यांनी नमूद केले होते पण त्याला अमेरिकेने अजून पर्यंत प्रतिसाद दिलेला नव्हता. पण आता मात्र त्याला अमेरिकेने तयारी दर्शवल्याने याबाबत पुढे काय प्रगती होणार याकडे आता जागतिक समुदायाचे लक्ष लागले आहे. सध्य अफगाणिस्तानात सरकारी फौजा आणि तालिबानी गनिम यांच्यातील संघर्ष अधिक उग्र बनला असून चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यातच त्या देशांतील हिंसक प्रकारात एकूण 1692 जण ठार झाले आहेत.