ट्रक चालकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांना अटक
‘आमच्या गावात ट्रक चालवायचा असेल तर 25 हजार रुपये द्यावे लागतील’ असे म्हणत दमदाटी करून ट्रक चालकाकडे खंडणी मागितली. हा प्रकार बुधवारी (दि. 23) सकाळी पावणे अकरा वाजता उर्से येथील महिंद्रा कंपनीच्या गेट समोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिथुन अंकुश शेळके (वय 27, रा. वारंगवाडी, ता. मावळ), जावेद अब्दुल बागेवाडी (वय 42, रा. दत्तवाडी, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हनुमंत भगवान बोराडे (वय 40, रा. भोसरी) यांनी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक चालक आहेत. ते त्यांचा ट्रक घेऊन उर्से येथे बुधवारी सकाळी माल खाली करण्यासाठी गेले होते. उर्से गावातील महिंद्रा कंपनीच्या गेट समोर आरोपींनी बोराडे यांचा ट्रक अडवला. ‘आमच्या गावात ट्रक चालवायचा असेल तर 25 हजार रुपये द्यावे लागतील’ असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करून खंडणी मागितली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.