रात्री दहाच्या आत होळी साजरी करा; राज्य सरकारची नियमावली जाहीर
![Celebrate Holi within ten at night; State Government Rules Announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/1_ModW-6NnDanR824vQK1eSg.jpeg)
मुंबई | होळीच्या सणाची सर्वत्र लगबग सुरू आहे. कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरीदेखील होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. रात्री दहाच्या आत होळी करावी, तसेच डीजे लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. डीजे लावल्यास कायदेशीर बंदी घालण्यात येणार आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यासदेखील कारवाई केली जाणार आहे, असेही नियमावलीत म्हटले आहे.
कोरोना अजूनही पूर्णपणे संपला नसल्याने होळी साजरी करताना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. आता उद्या, 17 तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. मात्र या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे. राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये, अशीदेखील सूचना देण्यात आली आहे.
होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही जाती, धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये, धुळवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नये, असेही नियमावलीत म्हटले आहे.