सात दिवसांमध्ये अडीच कोटी रुपये भरा; किरीट सोमय्यांना ‘लाइफलाइन’ची नोटीस
मुंबई | राज्यातील कथित कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणात आरोपांची राळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून आणखी एक नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये कंपनीची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी सात दिवसांत २.५ कोटी रुपये भरा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असे नमूद केले आहे. किरीट सोमय्या यांनी ही नोटीस ट्विट केली आहे.
या नोटिसीवरून किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सुजीत पाटकर लाइफलाइन हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेसनी मला वसुली नोटीस पाठवली. १०० कोटींचा घोटाळा उघड केल्याबद्दल ही नोटीस पाठवण्यात आली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या ‘डर्टी डझन’ विरुद्धची आमची लढाई थांबणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
तथापि, यापूर्वी १५ फेब्रुवारी रोजी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून किरीट सोमय्या यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामध्ये कंपनीने किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. किरीट सोमय्या यांनी नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांत लेखी माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असे कंपनीने म्हटले होते.