रेस्टोरंट मधील रोकड चोरून केबिनला लावली आग; कामगारावर गुन्हा दाखल
![Cabin set on fire after stealing cash from restaurant; Crime filed against the worker](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/fire.jpg)
पिंपरी चिंचवड | रेस्टोरंटमध्ये काम करणा-या कामगाराने रोख रक्कम चोरी केली. त्यांनतर केबिनमधील फर्निचर, कागदपत्रांना आग लाऊन त्याचे नुकसान केले ही घटना गुरुवारी (दि. 10) पहाटे तीन ते पाच सुमारास मोरवाडी पिंपरी येथे घडली.
मंटी देवनाथ (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नागारुखा, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी परमेश्वर बाळासाहेब तिडके (वय 33, रा. थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोरवाडी येथील सेन्ट्रल मॉलशेजारी असलेल्या एका रेस्टोरंट मध्ये काम करतात. आरोपी मंटी हा देखील फिर्यादी यांच्यासोबत काम करत होता. गुरुवारी पहाटे तीन ते पाच वाजताच्या सुमारास आरोपीने रेस्टोरंट मध्ये येऊन लॉकरमधून 59 हजार रुपये रोख रक्कम चोरी केली. त्यानंतर केबिन मधील संगणक, फर्निचर आणि कागदपत्रांचे आगीच्या सहाय्याने नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत