मुंबई विभागातील स्वायत्त महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन होणार
![The final year examination of the autonomous college in Mumbai division will be held online](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/online-exam.png)
मुंबई | मुंबईतील स्वायत्त महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील ऑनलाइनच होणार आहेत. याबाबत मुंबई विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक सोनाली रोडे यांनी पत्राद्वारे मुंबई विभागातील स्वायत्त महाविद्यालयांना आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. विद्यार्थ्यांच्या या तक्रारीची शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. मुंबई विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक सोनाली रोडे यांनी पत्राद्वारे मुंबई विभागातील स्वायत्त महाविद्यालयांना ऑनलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सोनाली रोडे म्हणाल्या की, मुंबईतील अनेक स्वायत्त महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महाविद्यालयाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध होता. मुंबई विद्यापीठांतर्गंत येणाऱ्या महाविद्यालयातील सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. मग आमच्याच परीक्षा ऑफलाइन का असा सवाल विद्यार्थ्यांनी केला होता. तशा अनेक तक्रारी देखील उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. मात्र हे महाविद्यालये स्वायत्त असल्यामुळे त्यांना आदेश देता येत नव्हता. या संदर्भात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यात याव्यात या संदर्भात स्वायत्त महाविद्यालयांना पत्र पाठवण्याचे निर्देश दिले होते. सामंत यांच्या निर्देशानुसार सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवण्यात आल्याचे रोडे यांनी सांगितले.