स्वप्नपूर्ती! पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो सेवेचे पंतप्रधान यांच्या हस्ते लोकार्पण
![Fulfillment of dreams! Dedication of Pimpri to Phugewadi Metro service by the Prime Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/pjimage-2022-03-06T172655.584.jpg)
पिंपरी चिंचवड | बहुप्रतिक्षित पुणे मेट्रो सेवेचे आज (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पिंपरी – चिंचवड मध्ये पीसीएमसी ते फुगेवाडी या मेट्रो मार्गिकेचे देखील ऑनलाईन उद्धाटन झाले. विविध फुले, हार आणि लाईटस् यांनी सजवलेल्या मेट्रोचे मोठ्या जल्लोषात नागरिकांनी स्वागत केले. पीसीएमसी ते फुगेवाडी हे अंतर मेट्रोने अवघ्या 10 मिनिटात पूर्ण केले. पिंपरी चिंचवडकरांची मेट्रोने प्रवास करण्याची आज स्वप्नपूर्ती झाली.
उद्धाटन प्रसंगी सर्व मेट्रो स्टेशनवर झेंडूंच्या फुलांचे हार, लाल कार्पेट, लाईटींग लावून सजावट करण्यात आली होती. सर्व स्टेशनवर देशभक्तीपर गीत वाजत होते. नागरिकांचा उत्साह आणि जल्लोष यामुळे मेट्रो परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. पीसीएमसी स्टेशन वरून 11.45 वा स्टेशन मास्टरने हिरवा झेंडा दाखविल्यानंतर प्रवासाला सुरूवात झाली, 11.55 वा मेट्रो फुगोवाडी येथे पोहोचली. अवघ्या दहा मिनिटात हा प्रवास पूर्ण झाला. फुगेवाडी येथे पोहोचताच प्रवाशांनी एकच जल्लोष केला. रस्त्याने ट्रॅफिक, सिग्नल यांचा सामना करत करावा लागणारा प्रवास आता मेट्रोच्या मदतीने सुपरफास्ट होणार आहे.
मेट्रो कर्माचा-यांनी मेट्रो प्रवासाच्या पहिल्या फेरीत सहभाग घेत जल्लोष केला व ‘हिपिप हुर्रर्रर्र’ चा जयघोष केला, या प्रवासात मोठ्या प्रमाणावर आजी माजी भाजप नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी ‘मोदी जिंदाबाद’ अशा घोषणा देत मेट्रोचे स्वागत केले. या प्रवासात काही सामान्य नागरिक देखील सहभागी झाले. कुणी मेट्रोसोबत सेल्फी तर कुणी व्हिडीओ कॉल करून आपल्या नातेवाईक व कुटुंबियांना ऑनलाईन मेट्रोची सफर घडवली.
मेट्रो उद्घाटनाबाबत बोलताना सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, आज नागरिकांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार झाले आहे. पिंपरी ते फुगेवाडी प्रवासाचा नागरिकांनी आनंद घ्यावा. सर्वसामान्याचा विचार करून प्रवासभाडे देखील वाजवी ठेवण्यात आले आहे. अपूर्ण राहिलेले काम प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेऊन केले जाईल. येत्या महिला दिनानिमित्त सर्व महिला फ्रन्टलाईन वर्कर यांना मेट्रोने मोफत प्रवास घडविला जाईल. त्यांच्या प्रवास भाड्याचा सर्व खर्च भाजप उचलेल. असे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसने केलेल्या निषेध आंदोलनाबाबत बोलताना ढाके म्हणाले, विरोधकांनी केलेली ही स्टंटबाजी आहे. नागरिकांसाठी सुरू होत असलेल्या सेवेचे त्यांना कौतुक नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्टंटबाजी केली आहे.