परदेशी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरही काही वर्षे कठीण ; काम करण्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा अभाव, खासगी रुग्णालयांकडे अधिक कल
मुंबई | युक्रेन, चीन, रशिया, जॉर्जिया इत्यादी देशांमधून वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेऊन भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पुस्तकी ज्ञान पुरेसे असले तरी प्रत्यक्ष रुग्णांना तपासण्याच्या अनुभवाचा अभाव असल्याचे निरीक्षण डॉक्टर, प्राध्यापकांनी नोंदवले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना काही वर्षे बरेच झगडावे लागत असल्याचे मत विद्यार्थी आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे.
युक्रेन आणि रशियातील युद्धस्थितीमुळे यासारख्या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव, गुणवत्ता आणि भारतात परतल्यावर काम करण्यासाठी पात्र ठरण्याची क्षमता असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेल्या स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थी आता परदेशी शिकण्याची सोपी वाट निवडत आहेत. पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भारतातील सरकारी रुग्णालयांत एक वर्ष सेवा करणे या विद्यार्थ्यांना बंधनकारक असते. त्यानंतरच संबंधित राज्यातील वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणीसाठी अर्ज करता येतो. पात्रता असल्याची खात्री झाल्यानंतरच परिषदेमार्फत या विद्यार्थ्यांची एमबीबीएस म्हणून नोंदणी केली जाते आणि डॉक्टर म्हणून सेवा देण्यासाठी परवानगी मिळते.