ठाण्याच्या अर्थसंकल्पात ८५ कोटींची वाढ
![85 crore increase in Thane budget](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/TV-4-TMC.jpg)
ठाणे | महापालिकेचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समितीने ८५ कोटी रुपयांची वाढ सुचविली आहे. महसुली आणि भांडवली खर्चात ही वाढ सुचविली असून तूट भरून काढण्यासाठी शहर विकास विभागाच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. यामुळे अर्थसंकल्प आता ३ हजार ३८४ कोटी रुपयांचा झाला असून त्यास स्थायी समितीने सोमवारच्या बैठकीत मान्यता दिली.
ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांच्याकडे पालिकेचा २०२२-२३ या वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला होता. ३ हजार २९९ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प होता. त्यात सुधारणा करण्यासाठी स्थायी समितीच्या गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू होत्या. सोमवारी झालेल्या बैठकीत स्थायी समितीने अर्थसंकल्पात सुधारणा करून त्यास अंतिम मंजुरी दिली. त्यामध्ये महसुली आणि भांडवली खर्चात ८० कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी शहर विकास विभागाच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. पालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पात विकास विभागाला ५०० कोटी ४२ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. परंतु यंदा शहर विकास विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. यामुळे स्थायी समितीने या विभागाचे उत्पन्न उद्दिष्ट आणखी ८५ कोटींनी वाढविले आहे. महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र कक्ष तयार करून सार्वजनिक शौचालय बांधणे या लेखाशीर्षांमध्ये ५० लाख रुपयांची तरतूद स्थायी समितीने राखून ठेवली आहे.
महसुली खर्चात वाढ
महसुली खर्चात ४० कोटी ५२ लाख रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे. त्यात मोबाइल डायग्नोस्टिक व्हॅनसाठी १ कोटी, पशुजन्म नियंत्रण योजनेसाठी १ कोटी, जंतुनाशकांसाठी ५० लाख, महापौर चषकसाठी १ कोटी, इमारती दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लाख, बीएसयूपी झोपडीधारकांना भाडय़ासाठी ५० लाख, बागांच्या देखभालीसाठी १ कोटी, जलवाहिन्या व जलकुंभ दुरुस्तीसाठी १ कोटी, स्मार्ट मीटर देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी, मलवाहिन्या देखभाल व दुरुस्तीसाठी १ कोटी आणि शाळांमध्ये १० योग केंद्रांसाठी ५० लाखांची तरतूद आहे.
भांडवली खर्चात वाढ
भांडवली खर्चात ४४ कोटी ४८ लाख रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे. त्यात एकात्मिक उद्यान विकासासाठी २ कोटी, अभ्यासिका बांधण्यासाठी १ कोटी, बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी १कोटी, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १ कोटी ७६ लाख, विकास आराखडय़ातील रस्ते नूतनीकरणासाठी ३ कोटी, यूटीडब्ल्यूटी रस्त्यांसाठी १० कोटी ५० लाख, मैदान विकासासाठी २ कोटी, सार्वजनिक शौचालये बांधणीसाठी ४ कोटी निधीची तरतूद केली आहे