आंदोलनाची दखल न घेतल्याने वीज वितरण कंपनीचे कार्यालय पेटवले
![आंदोलनाची दखल न घेतल्याने वीज वितरण कंपनीचे कार्यालय पेटवले](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/sangli-1-light.jpg)
सांगली |
शेतीसाठी दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकरी कार्यकर्त्यांनी मध्यरात्री कसबे डिग्रज येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय पेटवले. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
गेल्या सात दिवसांपासून श्री. शेट्टी हे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या आदीसह अन्य मागण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र शासन दरबारी या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. रविवारी रात्री उशिरा सांगली इस्लामपूर रस्त्यावरील कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. कार्यालयातील कागदपत्रे व अन्य साहित्य जाळून खाक झाले. पहाटे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. याबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.