एसटी वर्कशॉपसमोर आत्महत्या करण्याची एसटी कर्मचा-याची धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Arrest.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
दापोडी येथील एसटी वर्कशॉप समोर ‘मला विनाकारण बडतर्फ करण्यात आले आहे. मी तुमचे नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन’, अशी धमकी देणा-या एसटी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 19) सकाळी साडेसहा ते अकरा वाजताच्या दरम्यान दापोडी येथे घडली.
विनोद भोजू राठोड (वय 30, रा. एस टी कॉलनी, स्वारगेट, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दापोडी येथील यंत्र अभियंता अशोक सोपानराव सोट (वय 56, रा. वाघोली, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 22) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोपी दापोडी येथील एसटी कार्यशाळेच्या गेटवर आला. मला विनाकारण बडतर्फ करण्यात आलेले आहे. मी तुमच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन, अशी धमकी त्याने दिली. तसेच दापोडी येथील विभागीय कार्यशाळेच्या मेनगेट समोर रस्त्यावर आडवा झोपून राहिला. फिर्यादी यांचा शासकीय बसेस आरटीओ कार्यालय पुणे येथे पासिंगसाठी नेण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. मात्र आरोपीने मेन गेटवर रस्त्यात आडवे झोपून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.