बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष हत्येप्रकरणी ८ आरोपींना अटक; शुक्रवारपर्यंत संचारबंदी लागू
बंगळुरू | टीम ऑनलाइन
कर्नाटकातील शिवमोग्गा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष यांच्या हत्येनंतर झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना पाहता कलम १४४ आणखी २ दिवसांसाठी वाढवण्यात आले असून याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील दोन दिवस शाळा बंद राहणार आहेत. लोकांना सकाळी ६ ते ९ या वेळेतच बाहेर फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.
शिमोग्गा एसपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. आसिफ, सय्यद नदीम, रेहान शरीफ, निहान, अब्दुल अफनान आणि काशिफ अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एकूण १२ जणांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आठ जणांना अटक करण्यात आली असून हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचे वय २० ते २२च्या दरम्यान आहे. तर शिवमोग्गा एसपी लक्ष्मी प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि २०१६-१७ मध्ये दंगल केल्याबद्दल बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर हर्षा हत्येप्रकरणी अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्नाटकचे अतिरिक्त डीजीपी प्रताप रेड्डी यांनी आश्वासन दिले आहे की, पोलिसांच्या पथकांकडून जिल्ह्यात आणि परिसरात छापे टाकण्यात येत आहेत. लवकरच सर्व आरोपी पोलिसांच्या हाती लागतील.
दरम्यान, २० फेब्रुवारीला हर्षाची हत्या करण्यात आली होती. हर्षाच्या मृत्यूनंतर शिमोग्गासह संपूर्ण कर्नाटकात निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक, शस्त्रांचा वापर केला आणि वाहनांची जाळपोळही केली. या घटनेनंतर तणावाचे वातावरण पाहता जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. याशिवाय येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. संचारबंदीही लागू केली असून आता ती शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आली आहे.