सांगलीचा वीरपुत्र रोमित चव्हाणवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
![Funeral of Romit Chavan, Veerputra of Sangli in a state funeral](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Sangli.jpg)
सांगली | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीमेत वीरमरण पत्करलेल्या सांगलीच्या रोमित चव्हाण वर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज रोमितचं पार्थिव त्याच्या मुळ गावी शिगाव येथे आणण्यात आलं होतं.
आपल्या गावच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी वारणा नदीच्या काठावर गावकऱ्यांनी गर्दी केली होती. भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीराला अखेरचा निरोप देण्यासाठी सारा गाव यावेळी लोटला होता. रोमित याचे वडील तानाजी चव्हाण यांनी त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्याआधी भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या पथकाने त्याला शासकीय इतमामात मानवंदना दिली.
रोमित चव्हाणच्या वीरमरणामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. चव्हाण कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी गावकऱ्यांनी आज दुखवटा पाळला आहे. रोमितच्या पार्थिवाची आज संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी पुष्पचक्र वाहत रोमितला आदरांजली वाहिली.