पोलीस नाईकाकडे उत्पन्नापेक्षा दीड हजार टक्के अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/CRIME-4.jpg)
मुंबई | उत्पन्नापेक्षा सुमारे दीड हजार टक्के म्हणजेच १२ कोटी ६५ लाखांची मालमत्ता पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्याकडे सापडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल केला. पोलिसाच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे सांगली येथील रहिवासी असलेले सुरेश भीमराव बामणे २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९६ मध्ये पोलीस दलात दाखल झाले. गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) काम केलेले बामणे सुरूवातीपासून शीव येथे वास्तव्याला होते. त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या वादानंतर त्याने बामणे यांच्याविरोधात २०१८ मध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरुवातीला याप्रकरणी गोपनीय चौकशी केली. त्यानंतर एसीबीने केलेल्या खुल्या चौकशीत आरोपांमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. २००८ ते २०१८ या कालावधीत बामणे यांनी त्यांच्या व कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची एसीबीने माहिती घेतली. तपासादरम्यान बामणे यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा १२ कोटी ६५ लाख ६३ हजार ९६६ रुपयांनी त्यांची मालमत्ता अधिक असल्याचे निष्पन्न झाले. ती त्यांच्या उत्पन्नापेक्षा १,५१२ टक्के अधिक असल्याचे एसीबीने सांगितले.
एसीबीच्या तपासात शीव परिसरात त्यांची चार घरे, नवी मुंबईतील खारघर येथे तीन मजल्यांचा बंगला, सांगली येथे २० एकर जमीन, इनोव्हा गाडी, दुचाकी, सोन्याचे दागिने अशी मालमत्ता सापडली आहे. सांगली येथे द्राक्षाचे मळे आणि आंब्याच्या बागा असल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाले.