पक्षांतराचे मोसमी वारे वाहू लागले : आयारामांना रेड कार्पेट की निष्ठावंतांना संधी !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/politicians.jpg)
राष्ट्रवादीला अनेकांची पसंती
पिंपरी l प्रतिनिधी
महापालिका निवडणुका जवळ आल्याने अनेकांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारायला सुरुवात केली आहे. पक्षांतराचे मोसमी वारे वाहू लागले असून या वा-यात अनेकजण पक्षांतर करतील अशी चिन्हे आहेत. त्यामध्ये अनेक मातब्बर राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. भाजप देखील अनेकांना आपल्या गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे अशा सर्व पक्षात आयारामांना रेड कार्पेट मिळणार की वर्षानुवर्षे एकाच पक्षात असलेल्या निष्ठावंतांना संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन 2017च्या निवडणुकीत 128 जागांपैकी 77 भाजप, 36 राष्ट्रवादी, 9 शिवसेना, एक मनसे आणि पाच अपक्ष नगरसेवक निवडून आले. भाजपने निर्विवाद सत्ता काबीज केली. परंतु यात आयारामांची संख्या अधिक होती. त्यामुळे ही सत्ता पक्षातील निष्ठावंतांच्या जोरावर नाही तर आयारामांच्या ताकदीवर आल्याचे म्हटले जाते.
सन 2017 च्या महापालिका निवडणुकीत अनेकांनी भाजपला पसंती दिली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नितीन काळजे, माई ढोरे, संतोष लोंढे, अॅड. नितीन लांडगे, राजेंद्र गावडे, शैलेश मोरे, सुजाता पालांडे, संतोष बारणे यांच्या पत्नी माया बारणे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, चंदा लोखंडे, माधवी राजापूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यांना भाजपने महापालिका निवडणुकीत संधी दिली आणि त्यात ते नगरसेवक म्हणून निवडून आले.
शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या सीमा सावळे, आशा शेंडगे, मनसे नगरसेविका संगीता भोंडवे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे संदीप वाघेरे, तुषार हिंगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल जाधव यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. काँगेसचे राहुल भोसले, विनोद नढे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवून जिंकली. शिवसेनेचे तत्कालीन उपशहरप्रमुख शाम लांडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते निवडून आले.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले शुभांगी बोराडे, उर्मिला काळभोर, दत्तात्रय वाघेरे, विजय कापसे, सुरेखा लांडगे, स्वराज अभियानचे मारुती भापकर यांना उमेदवारी दिली. मात्र हे उमेदवार पराभूत झाले.
यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून पक्षांतराचे वार वाहू लागले आहे. मागील पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गजानन चिंचवडे यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची पक्ष विरोधी काम केल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे, चंदा लोखंडे यांचे पती राजू लोखंडे, महापालिकेतील अपेक्षांचे गटनेते कैलास बारणे, भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेनेत गेलेले नगरसेवक नारायण बहिरवाडे पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीत परतले आहेत.
पक्षांतर करणारे नगरसेवक, नेते विकासाची अथवा अन्याय झाल्याची कारणे देत आहेत. मातब्बरांच्या सावलीत राहिल्याने अनेकांना स्वतःची प्रतिमा घडवता आलेली नाही. मागील वेळी भाजपने आयारामांना रेड कार्पेट टाकून संधी दिली. त्यात अनेकजण विजयी झाले. त्याचीच परिणती महापालिकेत भाजपची सत्ता येण्यात झाली. मात्र आता अनेकजण राष्ट्रवादीला पसंती देत आहेत. पुढील काळात अनेकजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मागील वेळी भाजपने आयारामांना संधी देऊन सत्ता काबीज केली, तेच सूत्र राष्ट्रवादी आणि इतर पक्ष वापरणार की निष्ठावंतांना संधी देणार हे पाहणे महत्वाचे आहे.