राज्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्याची आता २३ फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी
![The state's water-rich Shivar scam will be heard again on February 23](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/images-2022-02-18T085933.575.jpeg)
बीड | आता परळी तालुक्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्याची २३ फेब्रुवारी रोजी पुन्हा लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात झालेला गैरव्यवहार आणि आर्थिक घोटाळा, त्यावर पुढील कार्यवाहीसाठी लोक आयुक्तांसमोर ही ऑनलाइन सुनावणी होणार आहे. २०१५ ते २०१८ याकाळात परळी वैजनाथ तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या बोगस कामांबाबत अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांविरुद्ध कृषी विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने वसंत संपतराव मुंडे यांनी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनंतर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.त्यासोबतच ९४ लाख रुपये अधिकारी- कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरकडून वसूल करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले.आता २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच पुणे येथील कृषी आयुक्तांना ऑनलाइन सुनावणीबाबत कळविण्यात आले आहे.जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्याप्रकरणी दोषींवर अटकेची आणि वसुलीची कारवाई करण्याचे आदेश आहेत. आरोपींना जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळालेला नाही.आरोपींना अटक करा आणि अपहारित रक्कम वसूल करा, असे आदेश न्यायालयाचे असताना कार्यवाही होत नसल्याबाबत तसेच कारवाई टाळण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होत आहे.आता पुढच्या कारवाईबाबत या सुनावणीमध्ये काय होणार हे लवकरच कळणार आहे.