हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान होईल- असदुद्दीन ओवेसी
![The girl wearing hijab will one day be the Prime Minister of India - Asaduddin Owaisi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/asaduddin-owaisi.jpeg)
मुंबई |
हा संपूर्ण आठवडा हिजाब प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत राहिला. मुस्लीम मुलींना हिजाब घालून शाळे प्रवेश देण्यात यावा की येऊ नये, यावरून हा वाद सुरू होता. यावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, याचसंदर्भात खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी मोठं वक्तव्य केलंय. हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान होईल, असं ओवेसी म्हणाले आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख ओवेसी यांनी रविवारी एक व्हिडीओ ट्विट केला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की “हिजाब परिधान केलेल्या महिला महाविद्यालयात जातील, जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, डॉक्टर, व्यवसायिक महिला होतील. मी कदाचित हे पाहण्यासाठी जिवंत नसेन, परंतु माझे शब्द लिहून ठेवा की एक दिवस हिजाब परिधान केलेली मुलगी या देशाची पंतप्रधान होईल.”
इंशा’अल्लाह pic.twitter.com/lqtDnReXBm
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 12, 2022
ते पुढे म्हणाले, “जर आमच्या मुलींनी हिजाब घालायचे ठरवले आहे आणि त्यांच्या पालकांना त्यांना हिजाब घालायचे आहे, तर त्यांचे पालक त्यांना पाठिंबा देतील. त्यांना कोण रोखतंय ते आम्ही पाहू!”
- हिजाब प्रकरण नेमकं काय?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.