दैनंदिन रुग्णांच्या संख्येत घट; उपचाराधीन रुग्णांची संख्या ५२ हजारांवर
![Decrease in the number of patients daily; The number of patients undergoing treatment is over 52,000](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/mv-corona.jpg)
मुंबई | राज्यात दैनंदिन करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी होऊन सुमारे ५२ हजार झाली आहे.राज्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये मोठय़ा प्रमाणावर घट झाली. जानेवारीमध्ये दैनंदिन सुमारे ३३ हजार ५१० रुग्ण आढळत होते, तर फेब्रुवारीमध्ये हे प्रमाण ११ हजार ८९२ रुग्ण आढळले आहेत. परिणामी, राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. १ फेब्रुवारीला राज्यात सुमारे १ लाख ९१ हजार रुग्ण उपचाराधीन होते, तर १२ फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी हे प्रमाण सुमारे ५२ हजारांपर्यंत घटले आहे.
राज्यात सध्या सर्वाधिक १४ हजार ४६१ रुग्ण पुण्यात उपचाराधीन आहेत. त्या खालोखाल नागपूर, नगर, मुंबई, औरंगाबाद आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील सुमारे ६० टक्के उपचाराधीन रुग्ण या जिल्ह्यांमध्ये आहेत.रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्येही घट झाली आहे. ७ फेब्रुवारीला रुग्णालयात सुमारे ९ हजार रुग्ण दाखल आहेत. ३१ जानेवारीला हे प्रमाण सुमारे १४ हजार ८१९ रुग्ण दाखल होते. मात्र उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत गंभीर रुग्णांचे प्रमाण मात्र काही अंशी वाढले आहे. ३१ जानेवारीला उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत सुमारे सात टक्के रुग्ण गंभीर होते, तर ७ फेब्रुवारीला हे प्रमाण सुमारे नऊ टक्के झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात १७९ रुग्ण
ठाणे : जिल्ह्यात शनिवारी १७९ करोना रुग्ण आढळून आले, तर तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील १७९ रुग्णांपैकी नवी मुंबई ६७, ठाणे ५६, कल्याण-डोंबिवली २६, मीरा-भाईंदर १४, ठाणे ग्रामीण ११, उल्हासनगर तीन, अंबरनाथ एक आणि भिवंडीमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. तर मृतांमध्ये नवी मुंबईतील दोन आणि कल्याण-डोंबिवलीतील एका रुग्णाचा समावेश आहे.