ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/CM-Devendra-Fadnavis-.jpg)
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
नागपूर – वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. या समाजाला नियमानुसार आरक्षण दिले जात आहे. त्यांच्या आरक्षणातून एक टक्का जरी केला तर प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबतचा प्रश्न कॉंग्रेसचे आमदार डी.पी.सावंत यांनी विधानसभेत उपस्थित केला. प्रवेशासाठी 70:30 चा फॉर्म्युला असतानाही त्यात बदल केला जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला. त्यांच्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हरकत घेत सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मुलांवर अन्याय होण्याची शक्यता अधिक आहे. विद्याथ्रयांवर अन्याय होउ नये म्हणून सध्याच्या फॉर्म्युला तयार करण्याबाबत लवकरच बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल.