व्याजदर वाढीच्या भीतीने निर्देशांकात पडझड
![Index falls on fears of interest rate hike](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/share-market-1.jpg)
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना सोमवारी पुन्हा समभाग विकण्याचा सपाटा सुरू केला.
मुंबई | महागाईला आवर घालण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी स्वीकारलेल्या कठोर धोरणाला स्वीकारून, भारतातही रिझर्व्ह बँकेकडून व्याजाचे दर वाढविले जातील, अशा गुंतवणूकदारांमध्ये बळावलेल्या भीतीची परिणती सोमवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १,०२४ अंशांनी घसरून ५८,०००च्या पातळीखाली बंद झाला.सलग तिसऱ्यां सत्रात घसरण होऊन, सेन्सेक्स सोमवारच्या सत्रात १,०२३.६३ अंश अर्थात १.७५ टक्क्यांनी गडगडून ५७,६२१.१९ वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ३०२.७० अंश अर्थात १.७३ टक्क्यांनी घसरून तो १७,२१३.६० वर खाली आला.
व्याजदराबाबत संवेदनशील एचडीएफसी बँक (३.६५ टक्के घसरण) आणि एचडीएफसी लिमिटेड या समभागांमध्ये झालेली विक्री ही सोमवारच्या निर्देशांकांच्या मोठ्या पडझडीमागील मोठे कारण ठरले. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना सोमवारी पुन्हा समभाग विकण्याचा सपाटा सुरू केला. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक हे समभागही गडगडले. लार्सन अॅण्ड टुब्रो, विप्रोमध्ये मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ पाच समभाग मूल्यवाढीसह बंद झाले.
रिझर्व्ह बँकेची व्याजदर निर्धारणासाठी पतधोरण समितीच्या द्विमासिक बैठक मंगळवारपासून सुरु होत आहे आणि गुरुवारी या बैठकीतून पुढे येणाऱ्यां निर्णयाकडे बाजाराच्या नजरा लागल्या आहेत. देशांतर्गत कडाडत आलेली महागाई आणि जगात इतरत्र मध्यवर्ती बँकांचे कठोर बनलेले धोरण पाहता, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाण्याच्या उच्च शक्यतांमुळे बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे, असे अनुमान जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्स-निफ्टीमधील प्रत्येकी पावणेदोन टक्क्यांच्या मोठ्या घसरणीच्या तुलनेत, व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्यां मुंबई शेअर बाजाराच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये प्रत्येकी १.२५ टक्क्यांची घसरण दिसून आली. आशियाई बाजार आणि युरोपीय बाजारात सोमवारी संमिश्र स्वरूपाचे वातावरण होते.
तिसरी घसरण; ५.८२ लाख कोटी मातीमोल
सोमवारच्या सलग तिसऱ्यां घसरणीसह, सेन्सेक्सने तीन सत्रांमध्ये मिळून १,९३७.४ अंश गमावले आहेत. या कालावधीत मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार भांडवली मूल्य ५.८२ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. अर्थात गुंतवणूकदारांच्या मत्तेत तीन दिवसांमध्ये झालेले हे नुकसान आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी गेल्या मंगळवारी ८५० अंशांनी उसळलेल्या सेन्सेक्समध्ये त्यानंतर बुधवारी उत्साह कायम दिसला आणि त्या सत्रात सेन्सेक्सने ७०० अंशांची कमाई केली. त्या पश्चात मात्र त्यात निरंतर घसरण सुरू आहे.