भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताच्या ४ क्रिकेटपटूंना कोरोना
![Corona to 4 Indian cricketers before the West Indies ODI series against India](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/FDSJrHUUYAINrY1.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
६ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. भारताच्या ४ क्रिकेटपटूंसह ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि नवदीप सैनी या चार खेळाडूंचा आणि सपोर्ट स्टाफमधील तीन सदस्यांचा समावेश आहे.
शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड हे रोहित शर्माचे दोन्ही सलामीवीर आता कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर केएल राहुल पहिल्या वन-डेसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे मयांक अग्रवालचा तातडीने संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र खेळाडूंना कोरोना झाल्याने आता एकदिवसीय आणि टी 20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाचे अहमदाबादमध्ये आगमन झाले आहे. यावेळी रोहित शर्मा हा एकदिवसीय संघाचा पूर्ण वेळ कर्णधार झाल्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत तो दुखापतीमुळे खेळला नव्हता.