दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइन घेण्यासाठी राज्यभर विद्यार्थ्यांचं आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या घराला घेराव
नागपूर | प्रतिनिधी
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असताना आज अचानक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. राज्यातील नागपूर, नांदेडसह काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइन घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. धारावीतही विद्यार्थ्यांनी आंदोलन करत थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घातला. आंदोलन विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
कोरोना संकटामुळे राज्यात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार असल्याचं शिक्षण विभागाने म्हटलं होतं. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांमधून विरोध होताना दिसत आहे. आज राज्यातील नागपूर, नांदेड, औरंगाबाद आणि मुंबईतील धारावीसह इतर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
नागपुरात सकाळी रस्त्यावर आलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली. नागपुरातील मेडिकल चौकात विद्यार्थ्यांनी गर्दी करत घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोलीस दाखल होत काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.
नांदडेमध्येही विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाइन घ्यावी अन्यथा रद्द करावी, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांनी नांदेडातील ITI चौकात एकत्र येत आंदोलन केलं. त्याचबरोबर जळगाव आणि औऱंगाबादमध्येही आंदोलन करण्यात आलं.
जळगाव शहरातही हिंदुस्तानी भाईच्या सोशल मीडियावरील आव्हानाला प्रतिसाद देत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आले. जळगाव शहरातील जीएस ग्राउंड येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं. पोलिसांनी मध्यस्ती करुन विद्यार्थ्यांना परत घरी पाठवलं.
शिक्षणमंत्र्यांच्या घराला घेराव
मुंबईत आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर शेकडो विद्यार्थी जमा झाले. वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषबाजी केली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दी वाढल्याने पोलिसांनी लाठीमार केला.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज अचानक विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जाणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.