‘झुकेंगे नही’ हा पुष्पातील डायलॉग शिवसेनेच्या बाण्यावरूनच घेतला असावा- खासदार संजय राऊत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/raut-pushpa.jpg)
मुंबई |
‘झुकेंगे नही’ हा पुष्पातील डायलॉग शिवसेनेच्या बाण्यावरून घेतला असावा. ‘झुकेंगे नही’ हा आमचा गेल्या ५५ वर्षापासूनचा नारा आहे. संजय राऊतांचा तर तो नाराच आहे. कशाला झुकायचं? का झुकायचं? संघर्ष करायचं, लढायचं. आमचे काही उमेदवार बाद झाले असले तरी आम्ही लढू असा निर्धार शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी टीव्ही ९ शी बोलताना व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचा निवडणूक अर्ज बाद करण्यावरुन ते बोलत होते.
“निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पण भाजपा तिथे अडचणीत असल्याने आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही आहे. आयोग सुनावणीही करत नाही. पुरावे समोर ठेवूनही सुनावणीला घ्यायला तयार नाही. निवडणूक आयोग गुलाम झाल्याचं लक्षण आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. गोव्यात फक्त पैशांचा आणि माफियांचा खेळ सुरु आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे भाजपात जातात अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
- “महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही”
महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात असाही टोला लगावला. महाविकास आघाडी हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे असंही ते म्हणाले आहेत. “जे वैफल्यग्रस्त असतात, निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. त्यांचा जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले.
- “भाजपासोबत युतीची चर्चा नाही”
“युतीची कसलीही चर्चा नाही. कुणाशीही चर्चा नाही. दबके आवाज वैगैरे असं काही नसतं. आमच्याकडून कोणी परस्पर काही बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तो मूर्खपणा आहे. शिवसेना-भाजपा युतीत आम्ही थोडंफार आम्ही २५ वर्ष एकत्र होतो, नांदलो ते नातं भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे. वैफल्यग्रस्त, निराश मनाने राजकारण करणारे असतात, त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशा असते,” असं राऊत म्हणाले.
- “स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडी एकत्र”
“स्थानिक पातळीवर स्थानिक राजकारण्याच्या नावाखाली काही भ्रष्ट हातमिळवणी होत असतात. आमची भाजपासोबत युती असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. आता अशी मनमानी चालणार नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही दक्षता घेत असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनेही घ्यावी. जास्तीत जास्त आपले नगराध्यक्ष निवडून यावेत यासाठी सर्वांनी काम करावं,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.