“चंद्रकांत पाटलांची प्रार्थना कोणत्या प्रकारची होती हे..”; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरुन खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया
![“चंद्रकांत पाटलांची प्रार्थना कोणत्या प्रकारची होती हे..”; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरुन खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Sanjay-Raut-Chandrakant-Patil-4.jpg)
मुंबई |
भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
“राज्याचे मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही अत्यंत नामर्दपणे टिका करत होतात. या नामर्दपणाला मुख्यमंत्री आणि जनतेने उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री स्वतः शिवाजी पार्क येथे आले होते. ज्या कोणी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नामर्दपणाची वक्तव्ये केली त्यांना चपराक बसली आहे. त्यांच्या अंतर्गत किती घाण आणि कचरा आहे हे स्पष्ट झाले आहे. मी वारंवार सांगत होतो की मुख्यमंत्री येणार आहेत. आजारपण कोणवर येईल सांगता येत नाही. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा अशा गंभीर दुखण्यातून जात होते तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेत होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. मुख्यमंत्र्याचे दर्शन झाल्याने राज्याची जनता उस्ताहात आणि आनंदात आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले. “विरोधी पक्षांनी एकप्रकारची नामर्दानगी आणली आहे. मोठ्या मनाच्या राजकारणाचा विरोधी पक्षांकडून ऱ्हास होत आहे. नामर्दानही हा शब्द भाजपाने आणला आहे म्हणून मी तो शब्द वापरत आहे. चंद्रकांत पाटलांची प्रार्थना कोणत्या प्रकारची होती हे सांगालया नको,” असेही संजय राऊत म्हणाले.