महापालिका निवडणूक: फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वॉर्ड रचना जाहीर होण्याची शक्यता; इच्छुकांचे देव पाण्यात
![पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उद्या प्रसिद्ध होणार प्रारूप प्रभाग आराखडा...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/pcmc-election-.png)
- महापालिका निवडणूक विभागातील अधिकृत सूत्रांची माहिती
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक केव्हा लागू होणार यावरून इच्छुकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. मात्र इच्छुकांची ही घालमेल येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संपण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाकडून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वॉर्डरचना जाहीर होऊन हरकती आणि सुनावणीसाठी मुदत जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.
कोरोनाची तिसरी लाट, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा यामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेली. महापालिकेची निवडणूक होणार तरी कधी यावरून रोजच चर्वितचर्वण सुरू आहे. मात्र निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणुका जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकाही जाहीर होण्याची दाट शक्यता होती. त्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकृत सूत्रांनी दुजोरा दिला आहे येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वॉर्ड रचना जाहीर होऊन हरकती आणि सुनावणीसाठी मुदत जाहीर होण्याची दाट शक्यता या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विद्यमान सभागृहाचा कालावधी 13 मार्च 2022 रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण न झाल्यास महापालिकेवर प्रशासक राज येण्याची शक्यता आहे. मागीलवेळी महापालिका निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान झाले होते. त्यासाठी प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास 23 सप्टेंबर 2016 रोजी राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली होती. 2017 च्या निवडणुकीचा निकाल 23 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला होता. 13 मार्च रोजी महापालिकेत नवीन कारभारी विराजमान झाले होते. परंतु, यावेळी जानेवारी महिना संपत आला. तरी, प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडाही जाहीर झालेला नाही. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत आगामी निवडणुकीसाठीच्या प्रक्रियेला सुमारे अडीच ते तीन महिने उशीर झाला आहे .