सांगलीतील मालमत्ता जाचक अटीतून वगळल्या
![सांगलीतील मालमत्ता जाचक अटीतून वगळल्या](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/home-loan.jpg)
सांगली |
सत्ता प्रकार ‘ई’ मधील जाचक अटीतून सांगलीतील मालमत्ता वगळण्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी शासन मान्यता दिली. काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला, त्यामुळेच हे यश मिळाल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले. शहरातील ३५ हजार व्यापारी आणि नागरिकांच्या साडेसातशेहून अधिक मालमत्ता गेल्या पाच वर्षांपासून ह्या अटीमध्ये अडकलेल्या होत्या, त्या आता मोकळय़ा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
या आदेशासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले,की ई सत्ता प्रकारात अडकलेल्या मालमत्ता खुल्या करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री थोरात यांनी गुरुवारी शिष्टमंडळास दिली. शहरातील ३५ हजार नागरिकांच्या साडेसातशेहून अधिक मिळकती शासनाच्या सत्ता प्रकार ’ई’ मध्ये गेली पाच वर्षे अडकल्या होत्या. त्यामुळे या लोकांचे मोठे नुकसान झाले. वखारभाग, टिंबर एरिया, ओव्हरसियर कॉलनी, दक्षिण शिवाजीनगर, कॉलेज कॉर्नर, रतनसी नगर, गावभाग येथील या मिळकती आहेत. नगरभूमापन विभागाच्या निर्णयामुळे व्यापारी आणि नागरिकांना आपल्या मिळकती हस्तांतरित करता येत नव्हत्या. त्यांची खरेदी – विक्री, वाटणीपत्र, बक्षीस पत्र, बँक गहाणखत यापैकी काहीही करता येत नव्हते. त्यामुळे या मिळकती मुक्त व्हाव्यात आणि त्यासाठीची कार्यवाही तातडीने व्हावी, यासाठीचा प्रस्ताव महसूल मंत्री थोरात यांच्याकडे प्रत्यक्ष शिष्टमंडळ घेऊन दिला आणि त्याचा पाठपुरावा केला. या वेळी व्यापारी आणि नागरिकांचे प्रतिनिधी महेश बजाज, मुकेश वझे, युवराज पाटील, अमित खोकले, रवी खराडे, सूर्यजित चव्हाण उपस्थित होते.