राज्यातील ६४ टक्के वाघ एकटय़ा चंद्रपुरात ; वाढत्या संख्येमुळे मानव -वन्यजीव संघर्ष अधिक
![64% tigers in the state in Chandrapur alone; More human-wildlife conflict due to increasing numbers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/tiger-2.jpg)
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ३० बछडे तर कोर क्षेत्रात २५ बछडे आहेत.
चंद्रपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून यांनी केलेल्या गणनेत राज्यात ३१२ वाघ व १६५ बछडयांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील २०० वाघ व ८९ बछडे एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. राज्यातील ६४ टक्के वाघ व ५४ टक्के बछडे चंद्रपूर जिल्ह्यात असल्यानेच येथे मानव वन्यजीव संघर्ष अधिक असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वनविभागाची बैठक नुकतीच दूरदृष्यप्रणालीद्वारे झाली . या बैठकीत राज्यात ३१२ वाघ व १६५ बछडे असल्याची माहिती देण्यात आली. यातील ६४ टक्के अर्थात २०० वाघ व ५४ टक्के अर्थात ८९ बछडे एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. ताडोबा, चंद्रपूर वनविभाग, ब्रह्मपुरी वनविभाग, मध्य चांदा वनविभागात या वाघ व बछडय़ांचे वास्तव्य आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ३० बछडे तर कोर क्षेत्रात २५ बछडे आहेत. चंद्रपूर वनविभाग, ब्रह्मपुरी वनविभाग व मध्य चांदा वनविभागात एकूण ३४ बछडे आहेत. वारंवार होणाऱ्या मानव वन्यजीव संघर्षांच्या घटना टाळण्यासाठी विशेष अभ्यासगटाने दिलेल्या शिफारसी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्या असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेता येतील याचा प्राधान्याने विचार करावा. असे निर्देश देण्यात आले आहेत.
पाच वाघांचा मृत्यू, दोन वाघिणींची शिकार
२७ नोव्हेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात एकूण पाच वाघांचा मृत्यू झाला. या पाचमध्ये तीन वाघिणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील दोन वाघिणींची जिवंत विद्युत प्रवाहाद्वारे शिकार करण्यात आली. २७ नोव्हेंबर रोजी मध्य चांदा वनविभागाच्या पोंभूर्णा तालुक्यातील कारवा येथे वाघीण मृतावस्थेत मिळाली. २६ डिसेंबर रोजी मध्य चांदा वनविभागात जखमी वाघीण एका पाइपमध्ये फसली होती. तिला बाहेर काढून नागपूर गोरेवाडा प्रकल्पात उपचारार्थ पाठविले असता तिथे मृत्यू झाला. ३० डिसेंबर रोजी अहेरीच्या जंगलात वाघिणीची विद्युत प्रवाहाद्वारे शिकार केली गेली, ३ जानेवारी रोजी भद्रावती येथे विद्युत प्रवाहाद्वारे वाघिणीची शिकार करण्यात आली, तर ६ जानेवारी रोजी वडसा वनपरिक्षेत्रात दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला.
ब्रह्मपुरीचे वाघ नवेगाव नागझिरा प्रकल्पात
ब्रह्मपुरी वनविभागातील वाघांची वाढती संख्या तथा मानव- वन्यजीव संघर्ष बघता तेथील चार ते पाच वाघांना येत्या मार्च महिन्यापर्यंत नवेगांव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हलविण्यात येणार आहे. देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेची विशेषज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. या संस्थेने यावर अभ्यासही केला आहे.