भोसरीतील मोबाईलच्या शोरूम मधून 55 लाखांचे मोबाईल चोरीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/theft-672x420.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
भोसरी येथील एम आर सूर्य इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या मोबाईलच्या भव्य शोरूममध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. शोरूम मधून तब्बल 55 लाख रुपये किमतीचे 222 मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 4) सकाळी उघडकीस आली.
प्रभू रतनलाल भाटी (वय 32, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाटी यांचे भोसरी येथे एम आर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाचे मोबाईलचे शोरूम आहे. सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास त्यांनी शोरूम कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी शोरुमच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. शोरूममधून तब्बल 55 लाख 12 हजार 642 रुपये किमतीचे 222 मोबाईल फोन चोरून नेले. फिर्यादी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.