अफगाणिस्तानात अभूतपूर्व परिस्थिती; अनेक भागांमध्ये २४ तास वीज नाही
काबूल | टीम ऑनलाइन
आशियाई विकास बँक, जागतिक बँक आणि अमेरिकेकडून होणारा वित्त पुरवठा थांबल्यामुळे अफगाणिस्तानमधील आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. वीज बिलाचे पैसे देणेही शक्य होत नाही. त्यामुळे अफगाणिस्तानात अभूतपूर्व वीजटंचाई निर्माण झाली आहे. देशाच्या अनेक भागांतील नागरिकांना २४ तास विजेशिवाय राहावे लागत आहे. याचा मोठा परिणाम उद्योग, व्यापार आणि व्यवसायावर झाला आहे.
अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यापासून तेथील परिस्थिती बदलली आहे. अफगाणिस्तानकडे सुरू असलेला मदत आणि निधीचा ओघ थांबला आहे. परिणामी तेथील नागरिकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. विजेची मागणी वाढत असताना निधीअभावी तेथील अनेक वीज प्रकल्पांची कामे बंद पडली आहेत. एवढेच नाही, तर बाहेरून विकत घेतल्या जाणाऱ्या विजेचे बिल भागवण्यासाठी तालिबानकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठाही बंद झाला आहे. या सर्व प्रकारामुळे अफगाणिस्तानात अभूतपूर्व वीजटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा मोठा फटका तेथील नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना बसत आहे.