पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत दत्तात्रेय भरणे बिनविरोध
![Dattatreya filling in Pune District Co-operative Bank election without any objection](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/dattatray-bharane-7_202109683732.jpg)
पुणे | प्रतिनिधी
ग्रामीण भागात जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे दिसते.
तत्पूर्वी या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप, खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील या महत्त्वाच्या जागाही आधीच बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. कालपर्यंत १२३ उमेदवारांनी माघार घेतली. तर या निडवणुकीसाठी ५ हजार १६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संचालक पदाच्या २१ जागांसाठी २९९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर १० उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची “ब” वर्गातून बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तर दुसरीकडे इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बँक मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. या जिल्हा बँकेतूनच अजितदादा यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९९१ पासून तब्ब्ल सात वेळा अजित पवार यांनी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
निवडणुकीची तारीख :
– जिल्हा बँकेसाठी मतदान : २ जानेवारी २०२२
– मतमोजणी : ४ जानेवारी २०२२
बँकेचे संचालक मंडळ : २१
– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : १३
– ब मतदारसंघ : १
– क मतदारसंघ : १
– ड मतदारसंघ : १
– अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ : १
– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : १
– विभक्त जाती व प्रजाती : १
– महिला प्रतिनिधी : २