गुलाबराव पाटील वादग्रस्त विधान : …आता त्यांना वाचवणारेही कलंकित : चित्रा वाघ
![File charges against Sanjay Raut, Gulabrao Patil too: Chitra Wagh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/chitra-वाघ.jpg)
गुलाबराव पाटील यांच्या माफीनंतर चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर निशाणा
पिंपरी | प्रतिनिधी
जळगावचे पालकमंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावरून माफी मागितली आहे. त्यानंतर भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महिलांचा अपमान करणारे गुलाबराव पाटील यांच्यासारखे मंत्री हे कलंक आहेत. आता त्यांना वाचवणारेही कलंकित झालेत, असे म्हणत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
एका भाषणात गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना रस्त्यांची तुलना ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती. त्यानंतर याबाबत नकारात्मक सूर निघाला. भाजपनेत्यांनी त्यावर सडकून टीका केली. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ‘जर माझ्या वक्तव्यानं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,’ असे म्हणत माफी मागितली.
यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गुलाबराव पाटील यांच्यासह थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ‘गुलाबराव पाटलांनी माफी मागितली आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केलं. ही नौटंकी चालणार नाही. पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करणार की नाही हे आधी सरकारनं सांगावं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
महिलांचा अपमान करणारे गुलाबराव पाटील यांच्यासारखे मंत्री हे कलंक आहेत. आता त्यांना वाचवणारेही कलंकित झालेत, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.