सहकाराबाबत आम्हाला कुणी सल्ला देऊ नका!; अमित शहांचे सहकार परिषदेत टीकास्त्र
![Don't give us any advice about cooperation !; Tikastra at Amit Shah's Co-operation Conference](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/amit-shah-2.jpg)
- अमित शहा यांचे सहकार परिषदेत टीकास्त्र
पुणे |
सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे अशी बोंब ठोकणाऱ्यांनीच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेत त्याचे खासगीकरण केले आहे. या क्षेत्रातील या अपप्रवृत्तींना लगाम लावण्यासाठीच केंद्र सरकारने ७५ वर्षांनंतर सहकार मंत्रालय काढले आहे. त्यामुळे सहकाराच्या बाबतीत आम्हाला उगाच कुणी सल्ले देऊ नयेत, अशी उपरोधिक टीका केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली. याचवेळी सहकारी साखर कारखानदारीसह जिल्हा सहकारी बँकाच्या डबघाईला या सहकारी संस्थांमध्ये वाढलेली बजबजपुरीच कारणीभूत असल्याचा आरोपही शहा यांनी या वेळी केला. या सहकारी बँका वाचविण्यासाठी कुठलीही समिती न नेमता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची थेट मदत घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
तालुक्यातील प्रवरानगर येथे आयोजित सहकार परिषद व शेतकरी मेळाव्यात शनिवारी शहा बोलत होते. अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते. अनेक सहकारी साखर कारखाने खासगीत विकत घेणाऱ्या नेत्यांवर टीका करीत शहा म्हणाले की एका बाजूला सहकार अडचणीत आलाय, केंद्राचा सहकारात हस्तक्षेप अशी बोंब ठोकायची आणि दुसरीकडे हजारो शेतकऱ्यांच्या मालकीचे सहकारी साखर कारखाने कुटुंबातील लोकांमार्फत विकत घ्यायचे, त्यांचे खासगीकरण करायचे. सहकाराला लागलेली ही मोठी कीड आहे. सहकारातील हे गैरप्रकार रोखण्यासाठीच केंद्र सरकारने ७५ वर्षांनंतर सहकार मंत्रालय काढले आहे. पद्माश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटलांनी काढलेला सहकारी साखर कारखाना आजही सहकार पद्धतीने सुरू आहे. याचा मला आनंद वाटतो कारण अनेक सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. कमीत कमी एक साखर कारखाना जपून ठेवत तो आज व्यवस्थितपणे चालू आहे याचा आनंद आहे.
देशातील साखर कारखान्यांचे प्रश्न पंतप्रधानांनी सोडविले आहेत. मात्र आज सहकारी साखर कारखानदारीसह जिल्हा सहकारी बँकाची परिस्थिती पाहिली तर, या सहकारी संस्थांमध्ये वाढलेली बजबजपुरीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप शहा यांनी केला. या सहकारी बँका वाचविण्यासाठी कुठलीही समिती न नेमता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची थेट मदत घेण्यात येणार आहे. सहकाराचे लवकरच विद्यापीठ तयार करण्यात येणार असून देशातील सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्याचे काम चालू आहे. त्यावर सचिवांची समिती काम करीत आहे. सहकार चळवळीला संकटातून बाहेर काढून ती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार काम करीत असल्याची ग्वाही देखील शहा यांनी दिली. राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न तर राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सहकार बँकांसमोरील अडचणी या वेळी मांडल्या. माजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांनी प्रस्ताविक केले तर खासदार डॉ. सुजय विखे यांनी अभार मानले. पद्मा पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार व राहिबाई पोपेरे यांचा व विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार देऊन डॉ. रमेश धोंगडे यांचा मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.