भाडेकरु हॉटेल व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी
![Fighting among students at MIT College](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/crime-2-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
भाड्याने हॉटेल चालविण्यासाठी दिल्यानंतर भाडेकरू हॉटेल व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत हॉटेल जागा मालकाने अरेरावी केली. मोठमोठ्या गुंडांच्या नावाचा वापर करून व्यावसायिकास धमकावले. तसेच डिपॉझिटसाठी दिलेले 25 लाख रुपये परत देण्यास नकार दिला. याबाबत हॉटेल व्यावसायिकाच्या कुटुंबाने पोलीस उपायुक्तांकडे धाव घेतली.
याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. तक्रारदार महिलेच्या पतीने रावेत येथील विजय ढुमे यांचे एक हॉटेल चालविण्यासाठी भाडेतत्वावर घेतले होते. त्यासाठी त्यांनी ढुमे यांना 25 लाख रुपये डिपॉझिट दिले आणि दरमहा 60 हजार रुपये भाडे देण्याचे ठरले होते.
असे असताना ढुमे यांनी हॉटेलमध्ये येऊन तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबियांना हॉटेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोठमोठ्या गुंडांच्या नावाचा वापर करून धमकावणे, दारू पिऊन हॉटेल मधील कामगारांना शिवीगाळ करून हॉटेल रिकामे करण्याची धमकी देण्याचे प्रकार ढुमे यांनी केले. हॉटेल चालविण्यासाठी दिल्यानंतर अद्याप पर्यंत भाडे करार केला नसून डिपॉझिटसाठी दिलेले 25 लाख रुपये बुडविण्यासाठी ढुमे हा उपद्व्याप करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
14 डिसेंबर रोजी रात्री ढुमे दारू पिऊन हॉटेलमध्ये आला. त्याने तक्रारदार यांचे दीर आणि हॉटेल मधील इतर कामगारांना शिवीगाळ केली. मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून गल्ल्यातून 45 हजार 700 रुपये रोख रक्कम काढून नेली. तक्रारदार यांचे पती रावेत चौकीत तक्रार देण्यासाठी गेले असता ढुमे याने पोलीस चौकीत येऊन तक्रारदार यांच्या पतीस मारहाण केली. ढुमे याच्या दोन साथीदारांनी तक्रारदार महिलेसोबत हॉटेलमध्ये गैरवर्तन केले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
आपण एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून मारून टाकण्याची धमकी देत तक्रारदार महिलेला ढुमे याने पोलीस चौकीत मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार महिलेने वरिष्ठांकडे कैफियत मांडली असल्याचे म्हटले आहे.